
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने २ मे ते ६ मे २०२५ या कालावधीत पाच दिवशीय निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.ध्येयदिशा पेरणी ही संस्था गेली सहा वर्षे विविध उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.
बालसंस्कार शिबीर हा उपक्रम दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये किशोरवयीन मुलांसाठी आयोजित केला जातो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रतिष्ठानचे तिसरे बालसंस्कार पेरणी निवासी शिबीर-२०२५ संपन्न होत आहे.
आनंदमय वातावरणात हसत खेळत मुलांच्या मनात सुसंस्काराची पेरणी करून त्यांचा सर्वागीण विकास साधण्याच्या हेतूने या शिबिरातील उपक्रम निर्धारित केले आहेत. त्याचबरोबर मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक स्तर उंचावून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध कला-कौशल्य व छंदावर आधारित सर्वसमावेशक कृती सत्रांचे आयोजन केले आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रम शिबिरात समाविष्ट आहेत.
ज्ञान संस्कार फेरी, शहीद कुटुंबीय मानवंदना, प्रार्थना, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, शिल्पकला, गीत संस्कार, बौद्धिक संस्कार, कला- कौशल्य, पारंपरिक खेळ, विचारधन, मनोरंजन इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या मनात सुसंस्कार पेरणीचे काम सुरू आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, योगाचार्य विठ्ठल जाधव, शिल्पकार मंदार लोहार, लेफ्टनंट कर्नल भानुदास जरे, अनिस कार्यकर्ता नाना पिसे, आहार तज्ञ डॉ.दिपाली काटकर, लक्ष्मीनारायण वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक भगवान जाधव, शिवनेरी केदार, श्रीकृष्ण पडळकर, लेफ्टनंट विजय शिंदे, वैशाली भोसले, सुहास प्रभावळे इत्यादीसह अनेक उपक्रमकर्ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी गायकवाड व कार्यवाह नंदकुमार जाधव यांनी दिली.