
माणदेश एक्सप्रेस न्यूज|परभणी : “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानात घुसून जो पराक्रम केला, तो नव्या आत्मनिर्भर भारताचा प्रतिक आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करतानाचे छायाचित्रण दाखवूनही काही लोक शंका घेत आहेत. अशा लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत केली.
येथील स्टेडियम मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या ‘विकास पर्व’ जाहीर सभेवेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “सर्जिकल स्ट्राइक असो किंवा ऑपरेशन सिंदूर असो, आपल्या सेनेच्या शौर्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे लोक ‘पाकव्याप्त काँग्रेस’चे प्रतिनिधी आहेत. अशा लोकांना तिरंग्याचा मान काय असतो, याची जाण नाही.”
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील आर्थिक प्रगतीचा आढावाही यावेळी मांडला. त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात १.६४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून, ही देशातील एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के आहे. हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले की, २०२६ पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून दिवसा १२ तास मोफत वीज देण्यासाठी २१,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
फळ व अन्नप्रक्रिया उद्योगासाठी परभणीत क्लस्टर तयार केला जाईल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर आधुनिक कर्करोग रुग्णालयही उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल ‘शत-प्रतिशत’ यशाकडे सुरू असल्याचे सांगत जिल्ह्यात शंभर लघु व मध्यम प्रकल्प उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.