
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे बंद असलेला बंगल्याला अज्ञात चोरट्यांनी लक्ष करत तब्बल 13 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सदर घटने बाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी सुशिला रामचंद्र ढगे यांचा मुंबई-मानखुर्दमध्ये ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. पतीच्या पश्चात त्यांनी हिमतीने मुलांसह व्यवसायाचा डोलारा सांभाळला आहे. त्यांच्या कुटुंबात पंधरा दिवसापुर्वीच एक विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने गावी आलेल्या सुशिला ढगे या आटपाडीत घरातील एका व्यक्तीला दवाखान्यात दाखल असलेल्या रूग्णाच्या सोबतीला घराला कुलुप लावुन आल्या होत्या.
याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत त्यांच्या बंद असलेल्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी, 80,000 किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन ब्रासलेट, 88000 किमतीचे 22 ग्राम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, 200000 किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बांगड्या, 120000 किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बांगड्या, 4000 किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान बाळाचे डोले, 16000 किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील एअररिंग, 88000 किमतीचे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व एअर रिंग, 30000 किमतीचे 400 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण व रोख 130000 रक्कम असे एकूण सात लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
सदरचा गुन्हा हा दिनांक 06 तारखेच्या रात्री 08.15 वा.ते दि.09 रोजीचे सायंकाळी 07.30 वा. दरम्यान घडला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, आटपाडी पोलीस निरीक्षक बहीर, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक थोरात यांनी भेट दिली आहे.