
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मराठी जनतेच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधूंनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्तपणे विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली असून, मेळाव्याची निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
हा मेळावा मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात होणार असून, वेळ सकाळी १० वाजता ठरवण्यात आली आहे. ठाकरेंच्या संयुक्त नेतृत्वाखाली होणारा हा मेळावा केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून, मराठी अस्मितेचा विजय आणि एकजुटीचा उत्सव म्हणून साजरा होणार आहे.
या मेळाव्यासाठीची विशेष निमंत्रण पत्रिका समोर आली असून, त्यावर “महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे… मग ही सुरुवात आहे” असा संदेश देण्यात आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नावासह “आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे” असा मजकूरही या पत्रिकेवर झळकतोय. यामुळे मेळाव्याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
याआधी प्रसिद्ध झालेल्या एका पत्रिकेत “आवाज मराठीचा!” या शीर्षकाखाली थेट मराठी जनतेला साद घालण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं, “सरकारला नमवलं का? तर हो नमवलं… पण कोणी? तर तुम्ही – मराठी जनांनी!” हा मेळावा केवळ ठाकरे बंधूंचा नव्हे तर मराठी जनतेच्या विजयाचा उत्सव असल्याचं स्पष्टपणे या पत्रिकांमधून सांगण्यात आलं आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.”राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची एकत्र छापलेली पत्रिका, एकत्र केलेला जल्लोष, आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हे भविष्यातील एकत्रित राजकारणाचे संकेत आहेत का?” असा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत.
ठाकरे बंधूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला, आणि त्यामुळेच हा मेळावा ‘मराठी जनतेच्या विजयाचा उत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये मराठी भाषा, अस्मिता आणि स्वाभिमान यांचा संगम असणार आहे, असं मेळाव्याच्या आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.