कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांनी कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय रुग्णालयात महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. तसेच पक्षातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित करत जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
जवाहर सरकार यांनी म्हटलं की, “कोलकाता येथील आर.जी.कर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भीषण घटनेमुळे मला खूप दुःख झालं. ममता बॅनर्जी आपल्या जुन्या शैलीत या प्रकरणात हस्तक्षेप करतील अशी मला आशा होती. मात्र, तसं काही झालं नाही. हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या भयंकर घटनेनंतर मी महिनाभर धीराने सहन केलं. ममता बॅनर्जी या डॉक्टरांशी भेट घेऊन चर्चा करतील, असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. जनतेचा हा रोष काही लोकांच्या आणि भ्रष्ट लोकांच्या वृत्तीविरोधात आहे. मी माझ्या संपूर्ण कार्यकाळात सरकार विरोधात एवढा अविश्वास कधीही पाहिला नाही”, असा आरोप जवाहर सरकार यांनी केला आहे.
जवाहर सरकार यांनी पत्रात काय म्हटलं?
“कोलकाता येथील आर.जी.कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य सरकारने याबाबत कारवाईची भूमिका घेतली. पण संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सरकारने तातडीने कारवाई केली असती तर बंगालमध्ये याआधी परिस्थिती पूर्वपदावर आली असती. राज्यात पंचायत आणि नगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर पक्षांच्या नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली आहे”, असा गंभीर आरोपही जवाहर सरकार यांनी केला.
दिल्लीला जाऊन राजीनामा सुपूर्द करणार
जवाहर सरकार यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाचा राजीनामा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपविला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपण लवकरच दिल्लीला जाऊन राज्यसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण राजकारणामधूनही सन्यास घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बलात्कार आणि खूनाच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर कारवाई करण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहनही त्यांनी पत्रात केलं आहे.