महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महिलांचा प्रतिसाद वाढत असल्याने योजनेची मुदतही वारंवार वाढवली जात आहे. काही महिलांनी ऑगस्ट अखेरीस या योजनेचे फॉर्म भरले आहेत. त्यांनाही लवकरच योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या महिलांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्यांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार? याची माहितीच दिली आहे. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या (सप्टेंबर) अखेरपर्यंत देऊ, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी ही माहिती दिली.
ज्या भगिनींनी ऑगस्टच्या शेवटी अर्ज केले आहेत. त्यांना लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे याच महिन्याच्या अखेरीला देण्यात येणार आहे. ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे नेते कोर्टात गेले होते. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. महिलांना त्यांचा हक्क दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचीही माहिती दिली.
तुमचा देवाभाऊ महाराष्ट्रात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या माध्यमातून क्रांती केली आहे. मोदींनी 11 लाख लखपती दिदी आपल्या राज्यात केल्या आहेत. आपल्याला 25 लाख लखपती दिदी करायच्या आहेत. पण या सगळ्या योजनांच्या विरुद्ध सुनील केदार यांचे निकटवर्तीय सुनील वडपल्लीवार कोर्टात गेले. या योजना बंद करण्याची त्यांनी मागणी केली. पण आम्ही आमच्या योजना बंद होऊ देणार नाही. आपल्या आशीर्वादाने मी विविध पदावर गेलो, मी बिल्डरशीप केली नाही, शाळा कॅालेज आणलं नाही. आपली सेवा केली. तुम्ही निवडून दिलेला देवाभाऊ महाराष्ट्रात परिवर्तन करतोय. तुमच्यासाठी काम करतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.