बाबा झाला फरार ; भक्त चिरडून ठार ; आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू

0
183

माणदेश एक्सप्रेस न्युज : हाथरस : स्वत:ला देवाचा अवतार समजल्या जाणाऱ्या भोलेबाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगासाठी शेकडो कुटुंबं उघड्यावर पडली. बाबा आला, प्रवचन देवून फरारही झाला. बाबाच्या वाहनाची धूळ माथी लावण्यासाठी उसळलेल्या गर्दीत १२१ जण चेंगरुन मेली. यात असंख्य लहान मुलं, महिला होत्या. मृतदेहांसह लहान मुलांच्या दुधाच्या बॉटल्स, चप्पला, सोबत आणलेल्या साहित्याचा खच पडलाय. पण इतका खटाटोप ज्याच्यासाठी केला होता, तो बाबा क्षणभरही न थांबता घटनास्थळावरुन पसार झाला.

80 एकर शेतजमिनीला संत्सगाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलं होतं. जवळपास २ लाखांची इथं गर्दी होती. आतला मंडप पूर्ण गर्दीनं भरलेला. मंडपाबाहेरही लोक उभे होते. मंडपाच्या बाजूला पावसाचं पाणी साचल्यानं घसरुन पडण्याचा धोका होता. या प्रवेशद्वारासमोरच हायवे आहे. बाबाच्या दर्शनासाठी त्या हायवेच्या अलीकडे आणि पलीकडेही गर्दी होती. भोलेबाबाची एन्ट्री या बाजूनं झाली. बाबानं प्रवचन दिलं आणि त्यानंतर बाबा रवाना व्हायला निघाला. बाबाच्या गाडीची धूळ अंगाला लागावी म्हणून मंडपातले लोक हायवेच्या दिशेनं धावले. पण हायवेवर आधीच तुफान गर्दी. त्यात मंडपातून गाडीमागे धावलेली गर्दीनं धक्काबुक्की झाली.

 

गुदमरु मरण्याच्या शक्यतेने महिला आणि काही पुरुष बाहेर पडण्यासाठी या दिशेला शेतीच्या बाजूनं धावले. पण आधीच निसरड्या जमिनीमुळे अनेकांचे पाय घसरले. अनेक महिलांना उठायला वेळ लागला. पण तोपर्यंत मागून येणारी गर्दी अंगावर आली आणि होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत आता पर्यंत १२१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

भगव्या वस्राऐवजी भोलेबाबा हा थ्री-पीस वा शर्ट-पँटच्या पेहरावात प्रवचन देतो. अलिशान सिंहासन आणि बाजूला पत्नी असते. पश्चिम उत्तर प्रदेशात बाबाचे मोठे भक्त आहेत. एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लिम वर्गही बाबाचा अनुयायी आहे. बाबाचं मूळ नाव सुरज पाल. निरुपणकार बनल्यानंतर त्यानं आपलं नाव नारायण साकार हरी केलं. लोक त्याला भोलेबाबा नावानं बोलावतात.

आधी 18 वर्ष यूपी पोलिसात नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेवून गावोगावी अध्यात्माचा प्रचार केला आणि अचानक बाबा निरुपणकारही बनला. आपला कुणीही गुरु नाही. फक्त ईश्वरावर श्रद्धा आहे, त्याची अनुभुतीही झालीय म्हणून स्वतः बाबा सांगतो कोरोनाकाळात ५० लोकांची परवानगी असताना बाबानं ५० हजारांची गर्दी जमवल्यानं वादातही आला होता. श्रद्धेत काहीही गैर नाही. पण अशा बाबांच्या पायाच्या धुळीसाठी लहान मुलांसकट स्वतःचे जीव धोक्यात घालणारे अनुयायी असतील., तोपर्यंत अशा बाबांचं पिक येतच राहणार.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here