पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ कॉंग्रेसला ; माजी आमदाराच्या मुलाला कॉंग्रेसने उतरविले मैदानात

0
554

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित पंढरपूर-मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाची उमेदवारी अखेर रविवारी (ता. 27 ऑक्टोबर) रात्री उशिरा जाहीर झाली आहे. ही दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे गेले आहेत. काँग्रेसने पंढरपुरातून भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली असून दक्षिण सोलापूरमधून माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेस पक्षाने विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. आजच्या उमेदवार यादीत चौदा जणांना संधी देण्यात आलेली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात पंढरपूर-मंगळेवढा आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. सोलापूर दक्षिणमधून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दिलीप माने यांना काँग्रेसने दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील दोन पक्षाने एकाच मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. माने यांच्या अगोदर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत.
दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की शिवसेना माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

भगीरथ भालके यांनी पंढरपूर पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा सामना आमदार समाधान आवताडे यांच्याशी झाला होता. मात्र, पोटनिवडणुकीत भालके यांचा निसटता पराभव झाला होता. आता त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडेही उमेदवारी मागितली हेाती. त्यानुसार त्यांना काँग्रेसकडून पंढरपूर मंगळेवढ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे.