
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर पाच दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला.
नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती.
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना इंद्रजित सावंत यांचे वकील असिम सरोदे म्हणाले की, “ज्या कलमांच्या आधारे प्रशांत कोरटकरवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नव्हती. त्यामुळे तांत्रिक गोष्टींचा आधार घेत त्याला जामीन मंजूर होणं हे सहाजिकच आहे. प्रशांत कोरटकरने जे वक्तव्य केलं त्याची व्याप्ती न्यायाधीशांनी लक्षात घ्यायला हवी होती आणि त्याला जामीन द्यायला नको होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण झालं नाही असं लेखी दिलं होतं. तरीही कोरटकरला जामीन देण्यात आला.
24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरटकरनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रशांत कोरटकर एक महिन्याहून अधिक काळ फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला आधी पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.