
बॉलीवूडच्या विनोदी चित्रपटांमध्ये ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर केले आहे. कितीही वेळा हा चित्रपट पाहिला, तर प्रेक्षकांचे मन काही केल्या भरत नाही. अतरंगी संवाद, अफलातून पटकथा, जबरदस्त गाणी आणि अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाच्या अभिनयाची अफलातून केमिस्ट्री या जमेच्या बाजूंमुळे या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यामुळे अनेक जण आजही या दोन्ही चित्रपटांमधील गाणी, चित्रपटातील मजेशीर भूमिका रिक्रिएट करत असतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जमशेदपूरमधील प्लेस्कूल (नर्सरी)मधील चिमुकल्यांनी एका कार्यक्रमात ‘फिर हेरा फेरी’मधील ‘ऐ मेरी ज़ोहराजबीं’ हे गाणे हुबेहूब रिक्रिएट केले आहे. या गाण्यामध्ये ‘फिर हेरा फेरी चित्रपटातील राजू, शाम, अनुराधा व अंजली गाणे सादर करत असतात; तर बाबुराव अगदी मजेशीर पद्धतीने त्यांच्या सादरीकरणात अडथळे आणताना दिसतात. तसे अगदी चित्रपटाप्रमाणे हे गाणेसुद्धा अगदी मजेशीर आहे. तर, नर्सरीच्या चिमुकल्यांनी कशा प्रकारे हे गाणे रिक्रिएट केले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
त तुम्ही पाहिले असेल की, चिमुकल्यांनी हे गाणे रिक्रिएट करताना गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटातील राजू, श्यामप्रमाणे दोन चिमुकले गाण्याची एकेक ओळ म्हणत आहेत आणि अनुराधा व अंजलीप्रमाणे दोन चिमुकल्या चिअर गर्ल्स म्हणून इतरांना साथ देत आहेत. तसेच या रिक्रिएट केलेल्या व्हिडीओची सगळ्यात मजेदार गोष्ट अशी की, एक चिमुकल्याला बाबुरावसुद्धा बनवला आहे आणि तो मजेशीर पद्धतीने धोती व बनियन घालून स्टेजवर गोलगोल फिरून या गाण्याला अगदी हुबेहूब ‘टच’ देतो आहे.
तसेच ‘चिमुकल्यांनी ऐ मेरी ज़ोहराजबीं गाण्यावर परफॉर्म करून रंगमंचावर आग लावली! गोंडसपणा आणि कॉमेडीचा मिलाफ, थेट फिर हेरा फेरीमधून!’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चिमुकल्यांवर फिदा झाले आहेत. त्यांनी चिमुकल्यांसाठी, तुम्ही काय केले आहे तुम्हाला माहीत नाही पोरांनो, या पार्टीमध्ये येण्याची एंट्री फी किती असेल, बाबुरावने काय अभिनय केला आहे, सगळी क्युट मुले एका फ्रेममध्ये आदी कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत.