औरंगजबाच्या कबरीला संरक्षण मात्र उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही : मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले

0
75

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाने ही कबर उखडून फेकण्याची मागणी केली. यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. त्यामुळे कबरीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकणार नाही, हे स्पष्ट करताना उदात्तीकरणसुद्धा खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंजेबाची कबर प्रोटेक्टेड आहे. आम्हाला औरंगजेब आवडो अथवा न आवडो कायद्याने साठ वर्षापूर्वी त्याला प्रोटेक्शन मिळाले आहे. म्हणून कबरीच्या संरक्षणाबाबत जो कायदा असेल त्याचे पालन करणे आमची जबाबदारी आहे. मात्र यावर कोणी राजकारण करीत असेल आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करीत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला.

 

लोकसभेच्या निवडणुकीपासूनच औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारणाला सुरुवात झाली होती. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट दिली होती. दुसरीकडे मंत्री नीलेश राणे यांनी ही कबर उखडूण फेण्याची मागणी केली होती. त्यावर अबू आझमी यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेत अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले होते.

 

औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असताना नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनीसुद्धा या मुद्याला हात घताला. अचानक औरंगजेबाची कबर चर्चेत कशी आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे फलक या कबरीजवळ लावण्याची सूचना त्यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here