वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहयोगी प्राध्यापक निलंबित

0
318

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बीवायएल नायर रुग्णालयातील (Nair Hospital) वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाला (Associate Professor) निलंबित (Suspended) केले आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपी-निलंबित सहयोगी प्राध्यापकांविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीडिता ही खेळाडू आहे. सहा महिन्यांपूर्वी, आरोपी असोसिएट प्रोफेसरने तिला बोलावले आणि तिने खेळलेल्या खेळांबद्दल विचारणा केली. काही दिवसांनंतर, त्याने तिला पुन्हा आपल्या केबिनमध्ये बोलावले जेथे त्याने तिच्या मानेला आणि कानाच्या मागे अयोग्यरित्या स्पर्श केला. त्याने दावा केला की, तो लिम्फ नोड्सची सूज तपासत आहे. तसेच प्राध्यपकाने तिला तिचा ऍप्रन काढण्यास सांगितले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्यास सुरुवात केली.

या घटनेमुळे घाबरलेल्या एमबीबीएस विद्यार्थिनीने सुरुवातीला तिच्या मैत्रिणी आणि वर्गमित्रांशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर एप्रिलमध्ये असोसिएट प्रोफेसरविरोधात तक्रार दाखल केली. रुग्णालय स्तरावरील स्थानिक चौकशी समितीने ऑगस्टमधील आपल्या अहवालात विद्यार्थ्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सांगितले आणि संबंधित सहयोगी प्राध्यापकाची बदली करण्यात यावी आणि त्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी थांबवावी, अशी शिफारस केली होती.

पीडितेने तिचा अभ्यास पूर्ण करेपर्यंत त्याला नायर हॉस्पिटलमध्ये ठेवू नये, अशी शिफारस करण्यात आली. पॅनेलने रुग्णालय व्यवस्थापनाच्या भूमिकेला दुर्दैवी आणि संपूर्ण प्रकरणाबद्दल असंवेदनशील असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आरोपी सहयोगी प्राध्यापकाला अध्यापन कर्तव्यावरून काढून टाकण्यात आले.

दरम्यान, बीएमसीने शनिवारी सांगितले की त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणात लैंगिक छळाच्या अतिरिक्त तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. चौकशीचे प्रथमदर्शनी निष्कर्ष आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन (BMC) प्रशासनाने आरोपी सहयोगी प्राध्यापकाला निलंबित केले आहे. मुख्यालयातील चौकशी समितीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here