ऑर्डर केलेले मोमोज वेळेत पोहचले नाही म्हणून ग्राहकानं असं काही केलं की, कंपनीला ग्राहकाला द्यावे लागणार तब्बल 60 हजार रुपये

0
180

ऑनलाईन फूड सर्व्हिस देणाऱ्या झोमॅटोनं (Zomato) अल्पावधीतच सर्वांच्या मोबाईलमध्ये अढळ स्थान मिळवलं. अनेकजण झोमॅटोवरुन फूड ऑर्डर करतात. तुम्हीही करत असालच… पण तुम्ही दिलेली ऑर्डर कधी उशीरा पोहोचलीये का तुमच्यापर्यंत? किंवा असं कधी झालंय का? ऑर्डर केली, बिलही दिलं पण ती ऑर्डर तुमच्यापर्यंतच पोहोचलीच नाही? असा काहीसा प्रकार कर्नाटकात राहणाऱ्या एका महिलेसोबत झाला आहे. कर्नाटकातील एका महिला ग्राहकानं झोमॅटोवर मोमोजची ऑर्डर दिली. तिथून डिलिव्हरी कन्फर्मेशन आलं. पण मोमोज आलेच नाहीत. मग यानंतर ग्राहकानं असं काहीसं केलं की, कंपनीला 133 रुपयांच्या ऑर्डरसाठी तब्बल 60 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

प्रकरण नेमकं काय?
ही घटना कर्नाटकातील धारवाडची आहे. धारवाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं 31 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटोवर मोमोज ऑर्डर केले होते. ऑर्डर केली, पैसे भरले आणि कन्फर्म झाल्याचा मेसेजही आला. पण काही तास उलटून गेल्यानंतरही त्यांची ऑर्डर काही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. यानंतर महिलेनं झोमॅटो आणि तिनं ऑर्डर केलेल्या रेस्टॉरंटशी संपर्क साधला. पण, मोमोज आलेच नाहीत. वारंवार फोन केल्यावर झोमॅटोनं 72 तास वाट पाहण्यास सांगितलं. कंपनी या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, त्यानंतरही तोडगा निघाला नाही. यानंतर महिलेनं सप्टेंबर 2023 मध्ये झोमॅटोच्या विरोधात धारवाडच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाशी संपर्क साधला.

झोमॅटोनं यावर काय प्रतिक्रिया दिली?
झोमॅटोनं ग्राहक न्यायालयात कोणतंही गैरवर्तन झाल्याचं नाकारलं. मात्र, प्रकरण सखोल जाणून घेण्यासाठी काही वेळ मागितला. पण अनेक दिवस उलटले, तरीदेखील झोमॅटोकडून काहीच कारवाई न झाल्यानं न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले. अखेर मे 2024 मध्ये झोमॅटोनं महिलेला तिनं दिलेल्या ऑर्डरची किंमत म्हणजेच, 133.25 रुपये परत केले. त्यानंतर झोमॅटोला न्यायालयानं याप्रकरणात दोषी ठरवलं. त्यानंतर महिलेला झालेल्या गैरसोयीसाठीही झोमॅटो जबाबदार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं.

न्यायालयाकडून 60 हजारांचा दंड
ग्राहक न्यायालयानं झोमॅटोला सेवेतील कमतरतेसाठी दोषी ठरवलं आणि ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासासाठी 50,000 रुपये भरपाई देण्यास सांगितलं. यासोबतच कायदेशीर खर्चापोटी 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाकडून झोमॅटोला देण्यात आले. म्हणजेच, ग्राहकाला एकूण 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश झोमॅटोला न्यायालयानं दिले आहेत.

न्यायालयानं निर्णयात काय म्हटलं?
ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष ईशप्पा के भुते यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे की, झोमॅटो ऑनलाईन ऑर्डरवर ग्राहकांना वस्तू पुरवण्याच्या व्यवसायात आहे. खरेदी किंमत मिळाल्यानंतरही झोमॅटोनं तक्रारदाराला आवश्यक उत्पादन वितरित केलं नाही. प्रकरणातील ही वस्तुस्थिती लक्षात घेता आमच्या मते, तक्रारदाराच्या दाव्याला उत्तर देण्यासाठी झोमॅटो जबाबदार आहे. त्यांच्या आदेशात आयोगाच्या अध्यक्षांनी झोमॅटोला झालेल्या गैरसोयी आणि मानसिक त्रासासाठी जबाबदार धरलं आहे. महिलेला खटल्याच्या खर्चासाठी आणि नुकसानभरपाई म्हणून 50,000 रुपये आणि 10,000 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

झोमॅटो शेअर्सचा उच्चांक
आज बाजार उघडताच झोमॅटोच्या शेअर्सनी नवा विक्रम गाठला. शेअर्सनी बीएसईवर 4 टक्क्यापेक्षा जास्त वाढून 232 रुपयांची नवीन विक्रमी पातळी गाठली. आज सकाळी त्याचे शेअर्स 225 रुपयांवर उघडले. अल्पावधीतच तो 232 रुपयांवर गेले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.