
माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. नुकतीच नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली असतानाच आता आणखी एका बड्या नेत्याच्या शिंदे गट प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात गाजू लागली आहे.
डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटाने पक्षप्रवेशाची ऑफर दिली असल्याची माहिती खुद्द पाटील यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
“माझ्या पक्षप्रवेशाबाबत मी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिंदे गटाकडून मला ऑफर आहे, मात्र सध्या मी बाहेरगावी असून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन,” असं स्पष्ट वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे देखील इच्छुक होते. काँग्रेसला तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीत उघड फाटाफूट झाली होती. यामुळे चंद्रहार पाटील यांची नाराजी आधीच उफाळून आली होती.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील दुसरे बडे नेते सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आपल्या नाराजीचा सुर उघडपणे व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून हाकालण्यात आलं. अशा पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांचाही शिंदे गटाकडे ओढा वाढल्याचं चित्र दिसत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, चंद्रहार पाटील जर शिंदे गटात दाखल झाले, तर ठाकरे गटाला सांगलीसह संपूर्ण माणदेशात मोठा फटका बसू शकतो. आधीच खालावलेली संघटनात्मक पकड, वरून बंडखोरी आणि नाराज नेत्यांचे पलायन, यामुळे ठाकरे गटाच्या भविष्यासमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.