
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेने आरोप मागे घेतले. मात्र सदर महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?, हे माझं वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?…घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. सदर महिलेने दिलेली कायदेशीर नोटीस मागे घेण्यात आली ह्यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतंय, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
ब्लेड ने स्वतःला कापून, स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदांचे उजवे हात आहेत, असे म्हणून तिला तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ न्याय आहे का?, असा हल्लाबोलही अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत. एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे, असंही अंजली दमानियांनी म्हटलं आहे.