
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर आणि त्याची प्रेयसी साधना काकतकर यांच्या विवाहानंतरचा गृहप्रवेश सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या सोहळ्यादरम्यान घेतलेल्या मजेशीर उखाण्यामुळे उपस्थितांचे आणि प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन झाले.
९ मे रोजी पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या अक्षय आणि साधनाच्या नव्या जीवनाची सुरुवात त्यांच्या घरातील गृहप्रवेशाने झाली. नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये अक्षय-साधनाचा गृहप्रवेश कसा पार पडला, हे पाहायला मिळते. पारंपरिक रितीरिवाजांनुसार वधूचा घरात प्रवेश झाला, तर या वेळी अक्षय आणि साधनाने घेतलेले उखाणे विशेष आकर्षण ठरले.
गृहप्रवेशाच्या वेळी अक्षयच्या बहिणीने नवदाम्पत्याला उखाणा घेण्यास सांगितले. यावेळी अक्षयने घेतलेला भन्नाट आणि विनोदी उखाणा सगळ्यांचे लक्ष वेधून गेला. “साधना घरी येणार म्हणून मी स्वतः धुतली या घरची लादी, साधना टेंशन घेऊ नको, पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लागला की, मी फिरवणार काश्मीरची प्रत्येक वादी!” असा दिलखुलास उखाणा घेत अक्षयने हास्याचा फवारा उडवला.
यानंतर साधनानेही पारंपरिक आणि गोड उखाण्याने सासरी गृहप्रवेश केला. “काकतकरांची लेक झाली केळकरांची सून, अक्षयरावांचं नाव घेते गृहप्रवेश करून.” असा उखाणा घेत तिने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात गोड आठवणींनी केली. या प्रसंगी अक्षयचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. साधनाच्या पाठवणीचे दृश्यही व्लॉगमध्ये भावनिक पद्धतीने टिपण्यात आले असून तिच्या आईसह कुटुंबीय भावूक झाल्याचे दिसून आले.
अक्षय आणि साधनाच्या विवाहसोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंतांनी उपस्थिती लावली होती. दोघांचे हे प्रेमविवाह अनेक वर्षांच्या नात्यानंतर प्रत्यक्षात आला असून, त्यांच्या नव्या आयुष्याला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.