राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा राज्यातील विविध भागांना भेटी देत असून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, गुप्तचर विभागाने अजितदादांना या गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अजितदादा यांच्या जीवाला धोका आहे. जिथे महिलांची गर्दी अधिक असेल तिथे जाऊ नका, अशा सूचना अजितदादांना देण्यात आल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनीच याची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा धुळ्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. तेव्हा ही माहिती दिली. माझ्या जीवाला धोका असल्याबद्दल गुप्तचर विभागाने मला खबर दिली आहे. मीडियामध्ये या बातम्या आल्या आहेत. जिथे महिला असतील, गर्दी असेल तिथे जाऊ नका अशा सूचना मला मिळाल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.
या दोन शहरात धोका
मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला धोका होईल, असं गुप्तचर विभागाने मला सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. राज्यातील भगिनींनी मला राख्या बांधल्या आहेत. जोपर्यंत या हातावर राख्या आहेत, तोपर्यंत मला कुणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचा आशीर्वाद, राखीचे सुरक्षा कवच आणि तुमच्या प्रेमाची ढाल यामुळे मला कोणताही धोका स्पर्श करूच शकत नाही, असं मला माझं अंतर्मन सांगतं, असं अजितदादा म्हणाले.
माय माऊलीला बळ मिळेल
आम्ही गरीब महिलांसाठी योजना आणतो आहे मात्र विरोधक विरोध करत आहेत. ते सरकारमध्ये असताना त्यांना कोणी अडवलं होतं? योजना आणताना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी आम्ही योजना आणल्या. अनेक वेळा अर्ज भरताना समस्या आल्या, वयाची अट असेल, कागदपत्र असेल याच्या अडचणी आल्या. पण आपण त्या सोडवल्या. आता 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आपण भावाच्या नात्याने आम्हाला राखी बांधता. हा भाऊ आपला आधारवड बनेल. आम्ही दिलेला शब्द पाळण्याचं काम करतो. तुम्ही जो बँकेचा अकाऊंट नंबर दिला आहे, त्यावर येत्या 17 तारखेला पैसे येतील. जी पात्र महिला आहे, तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे. 17 तारखेला दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. माझ्या माय माऊलीला बळ मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं.