
माणदेश एक्सप्रेस न्युज|पुणे – राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील गैरव्यवहाराबाबत मोठी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. “चूक झाली हे मान्य आहे. त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या, वेळ कमी होता, त्यामुळे तपासणी करता आली नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचेही सांगितले.
पुण्यातील सिंचननगर येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्यातील तब्बल २,६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे उघड झाल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर त्यांनी योजनेत झालेल्या त्रुटींबाबत खुलं विधान केलं.
“आमच्याकडे वेळ कमी होता. आम्हाला वाटलं होतं की अपात्र महिला अर्ज करणार नाहीत. पण तसे झाले नाही. तरीही आता दिलेले पैसे परत घेण्याचा विचार नाही,” असे अजित पवार यांनी सांगितले. पत्रकारांनी अपात्र महिलांवर कारवाईबाबत प्रश्न विचारल्यावर, “त्यांच्यावर कारवाई कशाला? त्यांनी अर्ज करायला नको होता, चूक झाली हे मान्य आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘लाडकी बहीण’ योजनेत काय घडलं?
राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत सरकारी नोकरीत असलेल्या, स्वतःची वाहने असलेल्या आणि अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनीही अर्ज करून अनुदान घेतल्याचे आढळून आले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजना तातडीने राबवण्यात आल्याने पात्रता निकषांची काटेकोर छाननी झाली नाही, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
या विधानामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता असून, योजनेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.