‘अजिंक्यतारा’ लखलखला…! मशाल महोत्सवात पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जनांनी आसमंत दणाणला…!

0
89

माणदेश एक्स्प्रेस/सातारा : अवकाशात फडकणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांचा निनाद, हलगीचा कडकडाट, तेजोमय मशालींनी उजळून गेलेली तटबंदी अन् अंगावर शहारे आणणाऱ्या शिवगर्जना, अशा उत्साही वातावरणात किल्ले अजिंक्यताऱ्यावर मंगळवारी रात्री मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी किल्ल्यावर हजेरी लावली.

 

 

 

सातारा शहरात दरवर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदा देखील शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १७) शाहू कलामंदिरात देशातील पहिले ‘शिव साहित्य संमेलन’ पार पडले. यानंतर स्वराज्याचे शिलेदार, थोरली मसलत ही व्याख्याने शिवशाहिरांचे पोवाडे, छत्रपतींची युद्धनीती, छत्रपतींचे दुर्गवैभव, अफजल खान वध, असे कार्यक्रम पार पडले. तर मंगळवारी (दि.१८) किल्ले अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला.

 

 

 

शिवजयंती उत्सव समितीकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. किल्ले अजिंक्यताऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार व बुरुजाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागोजागी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. डोळे दीपणारी विद्युत रोषणाई, फेटेधारी मावळे, मशालींचा लखलखाट अन् मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहून किल्ल्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here