
माणदेश एक्सप्रेस/सांगली : शहापूर (ठाणे) येथे झालेल्या खुल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सांगलीच्या विश्वनाथ बकाली याने ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले. तब्बल ३५ वर्षांनंतर सांगलीला हा बहुमान मिळाला. तसेच स्पर्धेत दोन सुवर्ण, गटात तृतीय, चतुर्थ क्रमांकासह सांगलीच्या खेळाडूंनी उपविजेतेपदही पटकावले.
शहापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य नामांकन खुली ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून आठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत शहरी भागातील स्पर्धेत ठसा उमटवला. विश्वनाथ बकाली याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा बहुमान म्हणजेच ‘महाराष्ट्र श्री’ होण्याचा बहुमान मिळवला. तब्बल तीस वर्षांनंतर सांगली जिल्ह्यातील खेळाडूने ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले.
राज्यस्तरीय स्पर्धेत रवींद्र आरते यांनी ३० जून १९९५ ला सांगलीतील पहिल्या स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’चा बहुमान मिळवला होता. तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मान म्हैसाळसारख्या ग्रामीण भागातून शहरातला स्टार जीम ट्रेनर म्हणून उपजीविका करणाऱ्या विश्वनाथ याने मिळवला.