तब्बल 17 वर्षांनी राज ठाकरे ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
208

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांच्या आक्रोशाला देखील सामोरं जावं लागलं आहे. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीच्या समोर सुपारी फेकत आंदोलन केलं होतं. या सर्व घडामोडींनंतरही राज ठाकरे यांनी आपला दौरा केला. विशेष म्हणजे राज ठाकरे आता पुन्हा सहा दिवासांच्या दौऱ्यावर आहेत. त्यातील पहिला दौरा त्यांचा अशा जिल्ह्यापासून सुरु होतोय, ज्या जिल्ह्यात राज ठाकरे तब्बल 17 वर्षांनी जात आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा गोंदियात दाखल झाला आहे. मात्र राज ठाकरे ट्रेनने गोंदियाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे 17 वर्षांपूर्वी गोंदियात आले होते. त्यांचा गोंदिया दौऱ्याचा जुना फोटो देखील व्हायरल होतोय. राज ठाकरे 2008 च्या नंतर आता दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांचा उद्या 21 ऑगस्टपासून विदर्भ दौरा सुरू होणार आहे. त्यांचा हा दौरा 26 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे.

राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसने गोंदियात पोहोचणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्यापासून विदर्भ दौरा सुरू होत असून या दौऱ्याची सुरुवात गोंदियापासून होणार आहे. राज ठाकरे उद्या विदर्भ एक्सप्रेसने गोंदियात पोहोचणार आहे. पण त्याआधी एक दिवसापूर्वीच त्यांचा गाड्यांचा ताफा गोंदिया येथील एका हॉटेल येथे दाखल झाला आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचा ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळत आहे. या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून गोंदिया शहरातील हॉटेल ग्रँड सिटी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.