माणदेश एक्सप्रेस/मुंबई : ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी ‘हाजरी’ या कार्यक्रमाद्वारे दिवंगत गुरू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना शब्द-सुरांच्या साथीने सांगीतिक आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये रंगलेल्या ‘हाजरी’ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एन आर टॅलेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे आयोजित या कार्यक्रमात दिवंगत पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या अमर वारशाला सलाम करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय कला आणि संस्कृतीतील अप्रतिम योगदानाबद्दल हेमा मालिनी यांना माहिती व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते तिसरा पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार प्रदान करण्यात आला.