मुंबईतील सायन रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन आणि मारहाण

0
399

मुंबई हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरला मारहाण; दारूच्या नशेत असलेल्या रुग्णाचं गैरवर्तन, नेमकं घडलं काय?
अँटॉप हिल परिसरात दोन कुटुंबांमध्ये भांडण झालं होतं. याचं परिवर्तन हाणामारीत झालं. यातील जखमींना सायन रुग्णालयात आणलं होतं. त्यातील एकावर उपचार करत असताना डॉक्टर योग्य पद्धतीनं उपचार करत नाहित, असं सांगून जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली आहे. डॉक्टरांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं घडलं काय?
मुंबईतील सायन रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. तक्रारीच्या आधारे पोलीस आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीच्या सायन रुग्णालयात आज (रविवारी) पहाटे साडेतीन वाजता हा प्रकार घडला. इथे एका रुग्णाच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि हातातून रक्तस्त्राव होत होता. रुग्णाला महिला ईएनटी डॉक्टरकडे पाठवण्यात आलं. चेहऱ्यावरील जखमेवर उपचारादरम्यान रुग्णानं डॉक्टरांना धक्काबुक्की केली. रुग्ण आधीच दारूच्या नशेत होता. सोबत असलेल्या दोन महिलांनी तुम्ही आमच्या पेशंटला नीट वागवलं नाही, त्याच्यावर नीट उपचार केले नाहीत, असं म्हणत महिला डॉक्टरला ढकलून दिलं.

त्यानंतर आरोपींनी महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावर रक्त लावलं आणि शेजारी ठेवलेला कापूसही लावू लागली. महिला डॉक्टरनं ज्यावेळी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिच्या हाताला दुखापत झाली. तसेच, आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही आरोप आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत नर्सेस आणि सुरक्षा यांना तातडीनं पाचारण करण्यात आलं. प्रकरण वाढत असल्याचं पाहून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर निवासी डॉक्टरनं सकाळी 7 वाजता सायन पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. या संपूर्ण घटनेबाबत आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here