एका 45 वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यासाठी विक्रमी 3 तासांत एक फुफ्फुस रायपूरहून पुण्याला नेण्यात आले. पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरु होते. महिला H1N1 आणि तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (ARDS) मुळे ग्रस्त होती, ज्यामुळे तिला फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. हे फुफ्फुस रायपूरमध्ये ब्रेन डेड घोषित केलेल्या दात्याकडून घेण्यात आले. अहवालानुसार, 11 ऑगस्ट रोजी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मंडळाने एका व्यक्तीला ब्रेन-डेड घोषित केले. यानंतर त्याचा अवयव गोळा करण्यासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथून एक विशेष टीम रायपूरला रवाना झाली. महिला रुग्णाला आधीच डीपीयु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे तिला एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) वर ठेवण्यात आले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये तिला तातडीच्या फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी सूचीबद्ध करण्यात आले होते.
फुफ्फुस मिळताच रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा अवयव रायपूर ते पुण्याला एअरलिफ्ट करण्यात आला, ज्यामध्ये रायपूर हॉस्पिटल ते रायपूर विमानतळ आणि त्यानंतर पुणे विमानतळ ते डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. रायपूर आणि पुणे पोलीस विभाग आणि विमानतळ प्राधिकरण यांनी मिळून हा ग्रीन कॉरिडॉर तयार केला, ज्याद्वारे रायपूर ते पिंपरी, पुणे हा अवयव अवघ्या 3 तासात पोहोचू शकला. गेल्या दोन आठवड्यांतील हे दुसरे फुफ्फुस प्रत्यारोपण आहे.