सांगलीमधील जत तालुक्यामध्ये पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ; 6 जणांसह 29 जनावरांवर हल्ला

0
21

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडचीत सहा जणांवर पिसाळलेला लांडग्याने हल्ला केला. या घटनेत एका विद्यार्थ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शालन हणमंत कांबळे (वय 38), पार्वती सुरेश घागरे (वय 40), आनंद सत्यपाल गेजगे (वय 45), सीआरएफ जवान विकास संभाजी भोसले (वय 25, सर्व रा. दरीबडची) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 29 जनावरांना चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी घडली.

त्या लांडग्याचा मृत्यू
दरम्यान, दरीबडची परिसरातील ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा लांबपर्यंत पाठलाग केल्याने दरीबडची गावापासून 4 किलोमीटर अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ या लांडग्याचा मृत्यू झाला.

शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला
जत पूर्व भागात शेतकरी शेतामध्ये काम करत असतानाच पिसाळलेला लांडगा लमाणतांडा येथे आला. दरीबडचीत शालन हणमंत कांबळे यांची डाळिंबाची बाग आहे. या डाळिंब बागेत काम करताना अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.पार्वती सुरेश घागरे या शेतात भांगलण करत असताना त्यांच्यावरही हल्ला करून हाताला चावा घेतला.

29 जनावरांना सुद्धा लांडग्याने चावा घेतला
ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यावर लांडगा संख रस्त्याकडे पळाला. त्यावेळी आनंद सत्यपा गेजगे यांच्यावर मागून लांडग्याने हल्ला केला. पिसाळलेला लांडग्याने चेहरा, हात, पाय, पोट व पूर्ण अंगावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. भोसले वस्तीकडे मेजर विकास संभाजी भोसले यांच्यावरही लांडग्याने हल्ला करून जखमी केले. एवढ्यावर न थांबता घरासमोर बांधलेले व शेतात चरत असलेल्या 29 जनावरांना सुद्धा लांडग्याने चावा घेतला.

या घटनेचे माहिती मिळताच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विश्वनाथ मोर्डी यांनी पाहणी करून चावा घेतलेल्या जनावरांना लस देण्याचे कामाला सुरुवात केली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.