माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता बँकेकडून विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी विनापरतावा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
येथील धनंजय गार्डनमध्ये बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँकेचे सुमारे दोन लाख ९० हजार कर्जदार शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून अपघाती विमा उतरवला आहे.
यापूर्वी मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. आता विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये विनापरतावा मदत देण्यात येणार आहे. बँकेला मिळालेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला पैसे दिले तर, त्यांना आधार मिळेल, हे लक्षात घेवून बँकेच्या संचालक मंडळाने मदतीचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षीचा दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेक्ती विमा योजनेच्या धर्तीवर आणखी योजना आणता येते का? याबाबत बँकेकडून चाचपणी करण्यात येत आहे. जिल्हा बँकेला ९७ वर्ष पूर्ण झाली असून बँकेला ९७ वर्ष पूर्ण झाली असून बँक शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे.