माणदेश एक्सप्रेस/नाशिक : युद्धाचा देव मानल्या जाणाऱ्या तोफखान्यातील अत्याधुनिक तोफांमधून गनर्सकडून दागण्यात आलेले बॉम्बगोळे अन् अचूक लक्ष्यभेदाने नाशिकच्या देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टिलरीच्या शिंगवे बहुला फायरिंग रेंज मंगळवारी दणाणली. भारतीय सैन्यदलाच्या पाठीचा कणा असलेल्या तोफखान्याचे शक्तीप्रदर्शनाने शत्रूच्याही उरात धडकी भरविली.
धनुष, बोफोर्स (१५५एमएम), के-९वज्र, अल्ट्रा लाइट होवित्झर (एम७७७), सॉल्टम, १५०एमएम लाइट फिल्ड गन, १३० एम.एम मिडियम गनसह मल्टी बॅरेल ग्रॅड बीएम रॉकेट लाँचरद्वारे अवघ्या १२सेकंदात एकापाठोपाठ एक सोडण्यात आलेल्या मिसाइलने लक्ष्य उद्ध्वस्त केले. निमित्त होते, देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने मंगळवारी युद्ध सराव अभ्यास प्रात्याक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रात्याक्षिक सोहळ्याचे नेतृत्व स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमाडंट व रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमाडंट अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट नवनित सिंग सरना यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नेपाळ सैन्य दलाचे ब्रिगेडियर मनोज थापा यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.
कोनहिल टॉप, हाथीमाथा, बहुला-१, बहुला-२, माउंड, हर्बरा, टेम्पल, ओपन पॅच, वॉल, व्ही-कट, हम्प, सगमाथा अशी नावे फायरिंग रेंजमधील सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांवरील टार्गेटला देण्यात आलेली होती. प्रत्येक तोफांसाठी वेगवेगगळे लक्ष्य निश्चित केलेले होत. हे सर्व लक्ष्य तोफांनी अचूकरित्या भेदून नेस्तनाबूत केले.