बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने केवळ आपल्या ॲक्शन अवतारातच नाही तर आपल्या कॉमिक भूमिकांनीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २००७ मध्ये अभिनेत्याचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया’ प्रदर्शित झाला, जो ब्लॉकबस्टर ठरला आणि नंतर क्लासिक बनला. यानंतर ‘भूल भुलैया’चे दोन सीक्वलही बनवण्यात आले. मात्र, दोन्ही सीक्वलमध्ये अक्षयच्या जागी अभिनेता कार्तिक आर्यनची वर्णी लागली.
सध्या अक्षय कुमार वीर पहाडियासोबत त्याचा आगामी चित्रपट स्काय फोर्सचे प्रमोशन करत आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, खिलाडी कुमारने आगामी ॲक्शन-थ्रिलर स्काय फोर्सबद्दल सांगितले, तर यादरम्यान अक्षयने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरेही दिली. खरेतर, प्रेक्षकांमधील कोणीतरी सांगितले की त्यांनी भूल भुलैया २ आणि ३ पाहिला नाही कारण खिलाडी कुमार त्याचा भाग नव्हता. भूल भुलैया फ्रँचायझीपासून वेगळे का झाले असे विचारले असता, अभिनेता म्हणाला, “बेटा, मला काढून टाकले होते. बस्स एवढंच.”
‘भूल भुलैया’ बद्दल चर्चा करण्यासोबतच अक्षयने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हेरा फेरी ३’ चे अपडेट देखील दिले. तो म्हणाला, “हेरा फेरी ३ सुरू होण्याची मी वाट पाहत आहे. मला माहीत नाही, पण सर्वकाही ठीक झाले तर ते या वर्षी सुरू होईल.” पुढे अभिनेता म्हणाला, “जेव्हा आम्ही हेरा फेरी सुरू केली तेव्हा आम्हाला माहित नव्हते की ती इतकी लोकप्रियता मिळेल. चित्रपट पाहिला तेव्हादेखील वाटले नव्हते. होय, मजा आली, पण बाबू भैय्या, राजू आणि श्याम ही पात्रे क्लासिक बनतील अशी आमच्यापैकी कोणालाही अपेक्षा नव्हती.”
संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित, ‘स्काय फोर्स’ २४ जानेवारी २०२५ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्याच्या सत्यकथेवर आधारित आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त स्काय फोर्समध्ये वीर पहाडिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.