माणदेश एक्स्प्रेस/सांगली : भारतात सर्वात जास्त हिंदू राहात असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतांवरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे. ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिले आहे त्यांची सुरक्षितता हे आमचे कर्तव्यच आहे, असे विधान मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
सांगलीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी हा शब्द पुढे आणला. ज्यांना सर्वधर्मसमभाव याची टेप लावायची असेल, त्यांनी पाकिस्तानात जाऊन लावावी, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्हालाही विशाळगडावर १२ तारखेला उरूस कसा भरतो, ते बघायचंय, असं म्हणत १२ जानेवारीला विशाळगडावर आयोजित केलेल्या उरुसाला नितेश राणे यांनी विरोध केला आहे.