बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महिना लोटला, तरीही पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. एक आरोपी अद्याप फरार असून अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी बीडमध्ये भव्य मोर्चे निघाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे.
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून राज्याच्या मुख्यमंत्रीनी गांभीर्याने लक्ष घालावे, असं शरद पवार म्हणालेत. तसेच, लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरावावं, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
“मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडानी अपहरण करून निघृण हत्या केली. या गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.