विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार

0
173

लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. हीच शक्यता लक्षात घेता राज्यभरातील पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली जात आहे. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष केंद्रातील नेत्यांनाही महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवणार आहेत. असे असतानाच आता काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोठी योजना केली आहे. या पक्षातर्फे काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेणार असून त्यासाठी काँग्रेसने नियोजन चालू केले आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात विक्रमी सभा होणार आहेत. स्व:त राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी येण्यास उत्सुक आहेत. तुम्ही बोलवाल तेथे मी सभेला येईल, असे राहुल गांधी यांनी प्रदेश नेतृत्वाला नुकत्याच झालेल्या सांगली दौऱ्यानिमित्य सांगितले आहे.

प्रियांका गांधींच्या 10 सभा होणार
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जवळपास 15 सभा तर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जवळपास 10 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहेत. तसे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून केले जात आहे.

भाजपा नेत्यांच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष
विशेषत: देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यासारख्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांना केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधी यांच्या सभांचे नियोजन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसला फायदा होणार का?
या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात झंझावाती दौरा केला होता. त्यांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत भाजपा, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याचाच परिणाम म्हणून भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील जागा कमी झाल्या. त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार असल्यामुळे नेमकं काय होणार? काँग्रेसला या सभांचा फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.