६० पेक्षा जास्त जागा हव्यात ,अजित पवार यांची मागणी

0
155

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 जागा मिळणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम असल्याचे बोललं जात आहे. याच अनुषंगाने नुकतंच अजित पवार गटाची अंतर्गत बैठक पार पडली.

अजित पवार गटाची अतंर्गत बैठक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीत झालेल्या जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार गटाची ही अंतर्गत बैठक होती. या बैठकीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी 60 पेक्षा जास्त जागा लढवण्याबद्दल भाष्य केले. तर महायुतीकडून अजित पवारांना फक्त ६० ते ६५ जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता महायुतीत जागावाटपावरुन नाराजी पाहायला मिळत आहे.

60 पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. यामुळे सध्या दोन्हीही पक्ष जागावाटपाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार आहेत. त्यासोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवारांनी एका मेळाव्यात केला होता.

यात त्यांनी काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहितीही दिली होती. तर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्यासोबत आहेत, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यामुळे अजित पवारांकडून 60 पेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी सुरु असल्याचे बोललं जात होतं.

विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा कायम
तसेच भाजप हे निम्म्याहून अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याचे बोललं जात आहे. भाजप २८८ पैकी १५० जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन नाराजी नाट्य सुरु आहे. तसेच आता विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.