सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. वाहतुकीच्या साधनांसोबतच वाहतूक मार्गांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. देशात अनेक द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत, ज्यामुळे केवळ दोन शहरांमधीलच अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार नाही तर, रस्त्याने लांबचा प्रवास करणे देखील सोपे होईल. याच क्रमाने, महाराष्ट्रातील पुणे ते कर्नाटकातील बंगळुरूला जोडणारा 700 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग (Pune-Bengaluru Expressway) बांधला जात आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासासाठी निम्म्याहून कमी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांच्या आर्थिक विकासाला नवे आयामही मिळतील.
प्रवास वेळ-
भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग बांधला जात आहे. या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात येत आहे. या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे. सध्या, बेंगळुरू ते पुणे हा प्रवास रस्त्याने पूर्ण करण्यासाठी अंदाजे 18 ते 19 तास लागतात. मात्र एक्स्प्रेस वे तयार झाल्याने हा प्रवास पूर्ण होण्यासाठी अवघे सात तास लागणार आहेत. यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून न पडता लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी सहज पोहोचता येईल.
12 जिल्ह्यांतून जाणार-
बंगळुरू-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्हे असतील.
महाराष्ट्रात हा मार्ग पुणे रिंगरोडवरील कांजळे येथून सुरू होऊन पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाईल.
कर्नाटकात, बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगलोर ग्रामीण या जिल्ह्यांतून जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे बेंगळुरू महानगर क्षेत्रातील सॅटेलाइट रिंग रोड येथे समाप्त करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रस्तावित खर्च-
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-पुणे एक्स्प्रेस वे पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च येणार आहेत.
कधी पूर्ण होणार?
हा मार्ग 2028 पर्यंत पूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या एक्स्प्रेस वेवर फक्त 6 लेन असतील, भविष्यात ते 8 लेनपर्यंत वाढवता येतील, असे सांगण्यात येते. (हेही वाचा: Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, वडीलांनाही पोलीस कोठडी)
वेग मर्यादा-
एक्स्प्रेस वेवर वाहन ताशी 120 किमी वेगाने धावू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या द्रुतगती मार्गाचे आतापर्यंत 72 किमीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित भागाचे कामही वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) देखरेखीखाली हा द्रुतगती मार्ग बांधला जात आहे.
एक्स्प्रेस वेची वैशिष्ट्ये-
पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस वे हा प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असणार आहे, ज्यावर हायस्पीड वाहनांना परवानगी असेल. द्रुतगती मार्गावर 2 आपत्कालीन हवाई पट्टी आणि 22 इंटरचेंज असतील. अतिवृष्टी किंवा प्रतिकूल हवामानाचा सामना करता येईल अशा पद्धतीने हा एक्स्प्रेस वे बांधला जात आहे. त्याचे सौंदर्य आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून प्रवाशांच्या सोयीनुसार त्याची रचना करण्यात आली आहे.