सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांना दम दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंतांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांना त्यांची औकात दाखवण्याची भाषा करणे म्हणजे स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे”, असं मिटकरी म्हणाले. तसेच, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना आता तरी त्यांची औकात दाखवणार आहेत का?” असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी सावंतांवर कारवाई केली नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी सावंतांना त्यांची औकात दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असंही मिटकरी म्हणाले.
शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील, वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात ही घटना घडली आहे. “सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत”, असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला.