नागपूर शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळं आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे.
आशा सेविकांच्या मानधनासंदर्भातील आश्वासनाची अंमलबजावणी नाही
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सी.आय.टी.यु) बहिष्कारचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक 7 हजार व गटप्रवर्तकांना 10 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिवाळी बोनससह इतरही आश्वासनाचा पत्ता नाही. त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी कार्यक्रमात उपस्थित राहणार असून त्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे.