मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु झाली. त्या योजनेत पात्र महिलांना १५०० रुपये जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे. योजनेचे एकत्रित दोन हप्ते काही दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यात जमा झाले. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिला उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना दिला जाणार आहे. तसेच योजनेचे आणखी दोन-तीन हप्ते जमा झाल्यावर वातावरणनिर्मिती होणार आहे. योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. परंतु काहींच्या अर्जात त्रुटी आढळल्या. त्या त्रुटी दूर करुन त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचे काम करावे लागणार आहे. या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन डिसेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेता येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेतच त्यांनी दिले होते. राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागणार आहे. राष्ट्रपती राजवट लावून काही आठवड्यात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया करण्यात येईल, त्यात काही गैर नसल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले होते.
महायुतीत योजनेच्या श्रेयासाठी लढाई
रक्षाबंधनानिमित्त लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्यातील शहरा-शहरांत बॅनरबाजी करुन श्रेय घेतले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले गेले आहे.