पालघर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. विरार परिसरात (Virar Area) कारने धडक दिल्याने 45 वर्षीय प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक (Arrest) केली आहे. आत्मजा कासट (वय, 45) असं या प्राध्यापिकेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मजा कासट या दिवसभराचे काम आटोपून घरी जात असताना अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांना कारने धडक दिली.
या अपघातात आत्मजा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, काही तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी कार चालक शुभम प्रताप पाटील हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय चाचणीत समोर आले आहे.
कार चालक शुभम प्रताप पाटील याला भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यात पालघर जिल्ह्यातील चारोटी टोल प्लाझाजवळ झालेल्या अपघातात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. राजस्थानहून नवी मुंबईला जात असलेल्या पाच प्रवाशांसह कारची ट्रकला धडक बसली होती. डहाणू तालुक्यातील चारोटी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH) टोल प्लाझाच्या काही मीटर अतंरावर हा अपघात झाला होता
या धडकेमुळे पिस्तादेवी अजितकुमार पोकरणा यांचा मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारचा चालक शांतीकुमार दिनेशचंदा बाफना आणि त्यांची पत्नी सिलकू बाफना, मुलगा किरीट बाफना आणि मृत महिलेचा पती अजितकुमार पोकरणा हे कारमधून प्रवास करत होते. या अपघातात हे सर्वजण गंभीर जखमी झाले होते.