पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी

0
883

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहेत. अनेक पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून काही पालख्या आज रात्रीपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत. अशातच राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुराच्या दिशेनं जात आहेत. डोंबिवलीवरुन निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे.

विठ्ठलाच्या ओढीनं सर्व वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.