कल्याणीनगर पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंनी सडकून टीका केलीय. अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा ही पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातल्या पक्षफुटीवरुनही त्यांनी टोले लगावले. अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी राज ठाकरेंची एक प्रकट मुलाखत झली. अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा अनेक विषयांविषयी आपली मते मांडली.
राज ठाकरे म्हणाले, पोर्शे अपघातात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना चिरडले. त्या अल्पवयीन मुलाच्या आईची, बापाची, आजोबाची चर्चा सुरू आहे. मात्र अपघातात मृत दोन तरुणांविषयी कोणीही बोलत नाही. मुलाच्या आई- वडिलांबाद्द बोलत नाही. ती केस कोर्टात गेल्यानंतर तिथला जज त्याला 300 शब्दाचा निबंध लिहायला लावतो. हा कोणता जज आहे. पैशाची देवणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टात होऊ शकत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार पोलीसांवर, कोर्टावर, सरकारवर? जनतेचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार आहे.
अमेरिकेत तुम्ही पोलीसांवर हात उचलू शकत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रात कोणी येत पोलीसावर हात उचलतो पुढे काही होत नाही त्याला एक दिवस जेल होते त्याला बाहेर सोडून देतात. पोलीसांवर हात टाकता हे अतिशय गंभीर आहे. किती खाली जायचे याला काही मर्यादा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि ‘मराठी’ म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत.