‘एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते, पॅशन असते, त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. करिअर, पॅशन यासंदर्भात बोलताना , उदाहरण देताना फडणवीस यांनी ही टिपण्णी केली. भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी करिअर, पॅशन याबद्दल मार्गदर्शन केले तसेच राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. मात्र त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला, त्यांच्या या विधानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या “उडान” पुस्तकाचे लोकार्पण झाले. त्यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला. ‘ अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले. मी थोडं वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत. के श्रीकांत हे ज्याचे आवडते फलंदाज असतील तर ती व्यक्ती आक्रमक असणारच. ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्यातले अमित साटम आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी यावेळी साटम यांची स्तुती केली.
उद्धव ठाकरेंना लगावला टोला
मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. ‘ एखाद्याला एखाद्या गोष्टीत आवड आहे त्याच गोष्टी त्यांनी कराव्या. एखाद्याची आवड फोटोग्राफी असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर काय होतं? अडचण होते,’ असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
गेल्या आठवड्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात भेटले. दोघांनीही लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये लिफ्टमध्ये आणि लिफ्टबाहेर मिळून पाच मिनिटं चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संवादाची कोंडी फुटल्याचंही बोललं जात होतं. मात्र आता फडणवीस यांच्या या विधानामुळे असं काही झालं नसल्याचं आणि त्यांच्यातील दुरावा कायम असल्याचीच चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. फडणवीसांच्या या टोमण्याला उद्धव ठाकरे काही उत्तर देतात का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.