
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस दमदार बरसत आहे. वसई-विरार परिसरात पाठिमागील दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसात मंजुळा झा नामक 70 वर्षीय महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. पाठिमागच्या दोन दिवसांपासून झा बेपत्ता होत्या. आपल्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या आणि नंतर त्या जवळच्या मंदिरा जाणार होत्या. मात्र, दरम्यान पडलेल्या पावसानंतर त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर अंगावर चिंचेचे झाड पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
वृद्ध महिला दोन दिवसांपासून बेपत्ता
अर्नाळा पोलिसांनी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांच्या मदतीने पडलेले झाड बाजूला करत असताना एका फांदीखाली मंजुळा यांचा मृतदेह आढळून आला. पद्मावती नगर येथील ऋषभ टॉवर येथे राहणाऱ्या झा या आपल्या मुलासोबत राहत होत्या. बेपत्ता झाल्या त्या दिवशी मंजुळा या सकाळी 6.20 च्या सुमारास घरून निघाल्या. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला आणि त्यानंतर अर्नाळा पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. महिला झाडाखाली दबल्याची कोणाला कल्पनाच नाही
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, स्थानिकांनी सांगितले की, त्यांनी झा यांना रस्त्याच्या कडेला फुले तोडताना पाहिले. असांगितले जात आहे की, त्या एका प्लॉटमध्ये गेल्या होत्या जिथे चिंचेचे मोठे झाड होते. दुर्दैवाने, सकाळी 6:45 च्या सुमारास, झाड पडले, त्याच्या मोठ्या फांद्यांमुळे भिंतीला आणि शेजारील एका मजली घराच्या टिनच्या छताला नुकसान झाले. त्यावेळी आतमध्ये असलेले घरातील रहिवासी अपघाताचा आवाज ऐकून बाहेर धावले परंतु झाडाखाली कोणी अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
बचाव पथकास झाड्याच्या फांद्या कापताना आली दुर्गंधी
सुरुवातीला झा या झाडाखाली असल्याचा कोणालाही संशय न आल्याने त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळीच, बचावकर्ते फांद्या आणि खोड कापत असताना त्यांना दुर्गंधी आली. सुगंध आल्यानंतर त्यांना ढिगाऱ्याखाली झा यांचा मृतदेह सापडला. तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांना एक तासापेक्षा जास्त वेळ लागला, त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस असताना किंवा आकाशात वीज चमकत असताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाकडून नेहमीच केले जाते. खास करुन विशेष काही कारण नसल्यास भरपावसात घराबाहेर पडणे ठाळावे. वृद्ध नागरिकांनी अडगळीच्या ठिकाणी थांबू नये. शहरातील नागरिकांनी पावसात आडोशाला उभा राहताना जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या वळचणीला थांबू नये, असेही अवाहन केले जाते.