पिझ्झा खाल्ल्याने 11 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू; पहा काय घडले

0
8

वीकेंड असो किंवा इतर कोणताही प्रसंग, सध्या पिझ्झा-बर्गर (Pizza) सारखे पदार्थ खाण्याची क्रेझ वाढली आहे. मात्र कदाचित पिझ्झा खाणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते. नुकतेच अमेरिकेतील टेक्सास (Texas) शहरातील एका 11 वर्षाच्या शाळकरी मुलीचा पिझ्झा खाल्ल्याने मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर तपासणीत समोर आले आहे की, तिने मृत्यूपूर्वी पिझ्झाचे सेवन केले होते. यामुळे तिला ऍलर्जी झाली आणि तिचा मृत्यू झाला. मुलीला वेळीच उपचार मिळाले असते तर, कदाचित तिचा जीव वाचला असता असेही सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील टेक्सास शहरातील एका शाळेतील 11 वर्षीय विद्यार्थिनी इमर्सन केट कोलने पिझ्झा सेवन केला होता, त्यानंतर तिला ऍलर्जी  झाली ज्यामुळे तिची तब्येत बिघडली. उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. मुलीवर वेळेवर उपचार न केल्याने तिच्या कुटुंबीयांनी शाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पिझ्झामध्ये भरपूर चीज वापरले जाते आणि ज्यांना दुग्धजन्य पदार्थाची ऍलर्जी आहे त्यांनी असा चीजयुक्त पिझ्झा खाल्ले तर त्याची ऍलर्जी होऊ शकते. यामध्ये सामान्यतः उलट्या, पित्त, पचन समस्या, ओठ सुजणे यांचा समावेश होतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये, ॲनाफिलेक्सिस देखील होऊ शकते, जी एक गंभीर जीवघेणी प्रतिक्रिया आहे. ज्या लोकांना डेअरी ऍलर्जी आहे त्यांनी दुग्धजन्य पदार्थ आणि पिझ्झा सारख्या गोष्टी खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. इमर्सन केट कोलला अशीच ऍलर्जी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुग्धजन्य पदार्थाची ऍलर्जी असलेल्या लोकांनी असे पदार्थ खाल्ल्यास, त्यांच्या तोंडाला खाज सुटणे, जीभ किंवा घशात सूज येणे, श्वास घेण्यात अडचण येणे, उलट्यांचा त्रास अशा समस्या उद्भवू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. मात्र, ही पहिलीच घटना नाही, याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इटलीतील एका 46 वर्षीय महिलेचा पिझ्झा खाल्ल्याने मृत्यू झाला होता.