
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याभोवती सध्या राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली असतानाच ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. “शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ओमराजे म्हणाले, “या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय यांचा कोणताही संबंध नाही. सध्या कलियुग सुरू आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पवनराजे हत्याप्रकरणी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करत ओमराजे म्हणाले की, “या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायासाठी शेवटपर्यंत लढा सुरू ठेवणार.”
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली. ओमराजे पुन्हा पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेत असतील, तर अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
ओमराजेंच्या पुढील निर्णयाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून ते शिंदे गटात जाणार की ठाकरे गटातच राहणार, याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.


