
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील अवैध वाळू उपशाविरोधातील कारवाईदरम्यान रविवारी पहाटे एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान देत महसूल पथकाच्या तावडीतून पलायन करण्याचा प्रयत्न केला. वाळूने भरलेल्या गाड्या पुढे, त्यामागे वाळू तस्कर आणि त्यांच्या मागावर स्वतः तहसीलदारांची गाडी अशा चित्रामुळे तब्बल दीड तास संपूर्ण परिसरात पाठलागाचा थरार रंगला.
जिल्हाधिकारी डॉ. मैनांक घोष यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत तहसीलदार श्रीमती शितल बंडगर रविवारी पहाटे महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील माण नदीपात्रात गस्त घालत होत्या.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी आलेले एक पांढऱ्या रंगाचे इंट्रा पिकअप आणि एक निळ्या रंगाचे हायवा वाहन महसूल पथकाला दिसून आले. पथकाने वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करताच चालकांनी वाहनांसह घटनास्थळावरून धूम ठोकली.
तहसीलदार शितल बंडगर यांनीही हार न मानता महसूल पथकासह तात्काळ पाठलाग सुरू केला. देशमुखवाडीहून सुरू झालेला हा पाठलाग सोनलवाडी, बागलवाडी, बेंदवस्ती, कटफळ मार्गे महूदपर्यंत पोहोचला. या काळात वाळू माफियांनी प्रशासनाची कारवाई हाणून पाडण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनासमोर इतर वाहने उभी करून अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती तातडीने सांगोला तहसील प्रशासन व पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक चौकशीत संबंधित वाहनांचा संबंध महूद येथील तानाजी सुनील लवटे यांच्याशी असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली आहे.
महसूल पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबतचा अहवाल तयार केला असून पुढील दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी तो सांगोला तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, “शासनाच्या महसुलाची चोरी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशारा तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांनी दिला आहे.
या घटनेमुळे आटपाडी तालुक्यात वाळू माफियांचे वाढते धाडस पुन्हा एकदा समोर आले असून प्रशासन आणि वाळू तस्कर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


