आटपाडीत जेवण देण्याच्या वादातून हॉटेलमध्ये धिंगाणा ;  महिलेचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण ; काऊंटरमधील रोकड लंपास

0
0

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : शहरातील आंबे बनमळा परिसरातील यशराज हॉटेलमध्ये जेवण देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर स्वरूप धारण करत दोन तरुणांनी हॉटेलमध्ये धिंगाणा घालत महिला चालकाचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण तसेच काऊंटरमधील रोकड घेऊन पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोंद असलेल्या फिर्यादीनुसार २० मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंबे बनमळा येथील यशराज हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपी अक्षय बाळू हाके (वय २६, रा. देशमुख गल्ली, आटपाडी) आणि सनद सुरेश मंडले (वय २८, रा. आटपाडी) हे हॉटेलमध्ये आले होते. जेवण तातडीने देण्याच्या मागणीवरून त्यांचा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला.
फिर्यादीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करत हॉटेलच्या किचनमध्ये प्रवेश केला. “आम्हाला लगेच जेवण द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी देत त्यांनी तेथील महिलेशी अर्वाच्य भाषेत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी तेथे पडलेले लाकडी दांडके हातात घेत महिलेला गळ्याजवळील कपड्याला धरून किचनबाहेर ओढले. या झटापटीत विनयभंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

घटनेदरम्यान आरोपींनी हॉटेलच्या काऊंटरमधील ड्रॉवर उघडून ५०० रुपयांच्या दोन नोटा आणि १०० रुपयांची एक नोट असे एकूण ११०० रुपये घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी, त्यांचा मुलगा यश, मुलगी मोनिका आणि भाऊ प्रशांत शिंदे यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी सर्वांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपी अक्षय हाके याने लाकडी दांडक्याने मोनिका देशमुख हिच्या उजव्या पायावर तसेच प्रशांत शिंदे यांच्या डाव्या पायावर वार करून त्यांना जखमी केले. मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झटापटीदरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही हरविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, आटपाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथेही आरोपी पोहोचले आणि “पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे जखमी कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी अक्षय बाळू हाके व सनद सुरेश मंडले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे आटपाडी शहरात खळबळ उडाली असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here