गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्या आटपाडी दौऱ्यावर ; विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
404

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकासकामांच्या भूमिपूजनासह शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा आटपाडी तालुक्यातील पहिलाच दौरा असल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्राप्त कार्यक्रमानुसार, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सकाळी ८.०० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहातून मोटारीने आटपाडीच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यानंतर सकाळी ९.४५ वाजता पंचायत समिती, आटपाडी येथे ते भेट देणार असून, विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. पुढे सकाळी १०.१५ वाजता जवळे हॉल येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ या महत्त्वाच्या उपक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

दरम्यान, गृहराज्यमंत्री पद भूषवणारे योगेश कदम प्रथमच आटपाडी तालुक्यात येत असल्याने पोलिस प्रशासन देखील अलर्ट झाले असून, दौऱ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
एकूणच, या दौऱ्याच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here