विभूतवाडीत डॉ. सचिन मोटे व राहुल हजारे यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक ; चिखलफेक प्रकरणाचा तीव्र निषेध

0
3

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : विभूतवाडी येथे सर्व समाजाच्या वतीने आयआरएस अधिकारी डॉ. सचिन मोटे आणि युवा उद्योजक राहुल हजारे यांच्या समर्थनार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी राजकीय वैमनस्यातून काही पुढाऱ्यांनी डॉ. मोटे आणि राहुल हजारे यांच्यावर चिखलफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

या आंदोलनासाठी विभूतवाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आटपाडी येथे जमा झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी डॉ. सचिन मोटे आणि राहुल हजारे यांच्या छायाचित्रांना दुग्धाभिषेक करून त्यांच्यावरील विश्वास आणि ठाम पाठिंबा व्यक्त केला. “समाजातील प्रामाणिक आणि कर्तृत्ववान व्यक्तींवर अशा प्रकारे चिखलफेक करणे ही अत्यंत घाणेरडी आणि निषेधार्ह बाब आहे. अशा प्रवृत्तीला समाज कधीही सहन करणार नाही,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

ग्रामीण भागात स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचेही अनेकांनी सांगितले. डॉ. मोटे आणि राहुल हजारे यांनी आपल्या कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्यावर केलेला हा प्रकार म्हणजे संपूर्ण समाजाचा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात विभूतवाडीचे सरपंच सुरज पाटील, विविध समाजांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शिस्तबद्ध पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, या घटनेबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व समाजाने एकजूट दाखवत चुकीच्या प्रवृत्तीविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here