VIdeo : व्हीप झुगारून मतदान; विनायकराव मासाळ यांची भूमिका अखेर स्पष्ट ; “शिवसेनेसोबत आघाडी केली म्हणूनच भाजप-शिवसेनेला मतदान” – पत्रकार परिषदेत खुलासा

0
359

आटपाडी / प्रतिनिधी :
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीदरम्यान व्हीप झुगारून भाजप-शिवसेनेला मतदान केल्यामुळे चर्चेत आलेले करगणी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य विनायकराव मासाळ यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आटपाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला.

अध्यक्षपदासाठी भाजपला तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळाल्यामुळे, आपण पूर्वी ज्या आघाडीतून निवडणूक लढवली त्या शिवसेनेच्या पाठीशी राहणे आवश्यक होते. त्यामुळेच व्हीप डावलून भाजप-शिवसेना आघाडीला मतदान केल्याचे मासाळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत आघाडी केली होती. करगणी जिल्हा परिषद गटातून मासाळ यांनी आमदार सुहास बाबर तसेच जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहकार्याने ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता.

मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर मासाळ यांनी पक्षाचा व्हीप झुगारून भाजप-शिवसेना आघाडीला मतदान केल्याने तालुक्यात मोठी राजकीय चर्चा रंगली होती.

याबाबत भूमिका स्पष्ट करताना मासाळ म्हणाले की, “ज्या आघाडीच्या बळावर आपण निवडून आलो, त्या शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळत होते. त्यामुळेच आम्ही त्या आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, येथून पुढे आटपाडी तालुक्यात ज्येष्ठ नेते राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here