
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे चोरीच्या संशयातून बापाने स्वतःच्या दोन मुलींना अमानुष शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात १० वर्षीय सानिका नाना यमगर हिचा मृत्यू झाला असून तिची बहीण अनुजा नाना यमगर हिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बनपुरी येथील सानिका (वय १०) व अनुजा या दोन बहिणींवर वस्तीवर चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ही बाब त्यांच्या आई-वडिलांच्या कानावर गेल्यानंतर मुलींना विचारणा करण्यात आली. यावेळी मुलींनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जाते.
यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी नाना यमगर यांनी २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुलींचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर टांगून ठेवले. या अमानुष शिक्षेमुळे दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली.
२६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता आजोबांनी दोन्ही मुलींना सोडविले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. यामध्ये सानिका हिचा मृत्यू झाला होता. तर अनुजा हिला तातडीने उपचारासाठी आटपाडी येथील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, सानिका हिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अनुजा हिने डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तिने वडिलांनी हातपाय बांधून रात्रभर टांगून ठेवल्याचे सांगितले तसेच बहिणीचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट केले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ बनपुरी येथे धाव घेतली आणि अंत्यसंस्कारापूर्वीच सानिका हिचा मृतदेह ताब्यात घेऊन आटपाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
या घटनेने बनपुरीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


