Atpadi : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनमध्ये खाजगी पाईपलाईन टाकणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस

0
395

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) : झरे गावच्या हद्दीत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या चारीतून खाजगी पाईपलाईन टाकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन अखेर सतर्क झाले असून संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग, तासगाव येथील सहायक कार्यकारी अभियंता यांनी मौजे झरे येथील गट क्रमांक ६१६, ६१० आणि ५७४ मधील शेतकरी रंगनाथ शंकर कटरे (रा. पारेकरवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना नोटीस पाठवली आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी बंदिस्त नलिकेच्या चारीमध्ये खाजगी पाईपलाईन टाकली आहे. यामुळे सिंचनाच्या आवर्तनांचे नियोजन, पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधितांना नोटीसीद्वारे स्पष्ट निर्देश दिले असून, नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत सदर खाजगी पाईपलाईन चारीच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करावी, तसेच टेंभू प्रकल्पाच्या मूळ पाईपलाईनला कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही झरे परिसरात टेंभू योजनेच्या पाईपलाईनमध्ये अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. माध्यमांतून हा मुद्दा पुढे आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात अशा प्रकारांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टेंभू योजनेचा सुरळीत पाणीपुरवठा कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाहणी व तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here